Wednesday 8 February 2012

वेळ



              वेळ    
    वेळ ही किती महत्वाची आहे,हे आता कोणी कोणाला समजावून सांगण्याची गरज नाही.आज परदेशी वेळे नुसार आपल्याकडे वेळ पाळावी लागते.काहीजण तर असंही म्हणतात की,परदेशी कंपन्या आल्या म्हणून आपल्याकडची भावी पिढी वेळेचं महत्व समजू शकली.कारण त्यांचे सर्वच काम रिझल्ट दाखवायला लावणारे आहे.त्यामुळे रिझल्ट नसेल तर लवकरात लवकर घरी ,नाहीतर पगार कमी,पैसा कमी.हे सगळं डोक्यात येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काल एक काकू फोन वर सांगत होत्या की,अग माझ्या मुलाचा जॉब( हा आता मराठी शब्द झाला आहे)रिझल्ट ओरिएन्टेड आहे ना? म्हणून त्याला अजिबातच वेळ होत नाही.
    आम्ही त्याच्या लग्ना बद्दल बोलत होतो. तो ३३ वर्षाचा झाला आहे म्हणून सर्व मैत्रिणी त्यांना विचारत होत्या की,लग्न करणार की नाही?कुठे नाव नोंदवलं आहे का? तुला जायला कुठे वेळ होत नसेल तर सरळ ऑनलाईन नोंदव.घर बसल्या सगळी माहिती आणि मुलालाही लगेच स्थळ बघता येईल.खरं तर त्यांनी तसं केलं होतं पण मुलगा काही बघायलाच तयार नाही.बरं त्यानं ठरवलं आहे का?तर तसं नाही.ऑफिसमध्ये गेल्यावर तो मोबाईल सुद्धा घेत नाही,तो त्याच्या सहकारी घेतो आणि सांगतो की आमचे साहेब सतत मिटींग मध्ये असतात.त्यामुळे त्यांना वेळ नाही.त्याच्या आईने फोन केला तरी त्याला वेळ नाही.मग लग्न कसं करणार.
   संपर्काची,दळणवळणाची अद्यावत साधनं आली.सगळं वेगात होवू लागलं. म्हणजे वेळ उरायला हवा.पण तो पुरतच नाही.का असं होतं?आपण महत्व कशाला आणि किती द्यायचं हे ठरवू शकत नाही.म्हणून असं होतं का?की आपण ज्या लोकांबरोबर काम करतो त्यांना तुमच्या वैयक्‍तिक आयुष्यात कसे आहात?तुमच्या गरजा काय आहेत?कौटुंबिक स्तरावर तुम्ही आनंदी आहात का?याचं काही घेणं देणं नाही का?काल आमची एक मैत्रीण सांगत होती की त्यांना २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ला सुट्टी नसते.पण अमेरिकेत ज्या दिवशी सगळयांना ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा मात्र सुट्टी असते.असच काहीसं लग्न ठरविण्याच्या वयात मुला-मुलीचं होत असावं. असं वाटतं.आपण मारे करियर म्हणून धावत असतो पण खरेच तिथं काही विशेष घडतं का? ज्यामुळे आपण योग्य जोडीदारचा सुद्धा शोध घेवू शकत नाही.लग्न करणं,योग्य जोडीदार शोधणं हे आपल्यालाच महत्वाचं वाटत नसेल किंवा लग्न करू नये असं वाटत असेल तर गोष्ट वेगळी.पण ज्या गोष्टीवर आपलं सगळं आयुष्य उभं करायचं आहे,ज्या व्यक्ती बरोबर काढावं असं वाटत आहे तिच्या साठीच वेळ नाही.हे म्हणजे स्वतःला तपासून पाहण्याची गरज आहे ह्याचं निदर्शक आहे.
      वेळ नाही हे कुठून सुरु होते?आज तर डबल इन्कम नो किड्स’ ही परिभाषा व्हायला लागली आहे.मुल व्हायचं तर किमान नऊ महिने वाट पहावी लागणार.तेवढ्यात एखादा प्रोजेक्ट संपला आणि पुढच्या प्रोजेक्ट मध्ये एवढा पैसा मिळाला नाहीतर.समजा एवढी सगळी तडजोड करून मुल झालं तर त्याची सकाळ पटपट ,लवकर, या शब्दाने सुरु होते.शाळेत ही शिक्षिकांना मानसशास्त्रीय पद्धतीने शिकवण्यापेक्षा उरकण्याची घाई असते.कारण त्यांनाही विशिष्ट भाग विशिष्ट वेळेत पूर्ण करायचे बंधन असते.त्यांना मुलाच्या मनाचा विचार करण्यास वेळ नसतो.कॉलेज,नोकरी या ठिकाणीही फक्त रिझल्ट योग्य लागण्याच्या गडबडीत कामाची मजा,त्यातून मिळालेले धडे बघायला वेळ नसतो.म्हणजे स्वतःसाठी वेळ नसतो.
    अशा वेगवेगळ्या ताणाच्या परिस्थितीत ही लग्न इच्छुक मंडळी काम करीत आहेत.पण या सर्व परिस्थितीला तोंड देतांना आज त्यांना काही समस्या नाहीत,कारण कामाची नशा आहे.खूप पैसा,गाडी,बंगला,काहीतरी करून दाखविण्याची इच्छा आहे.त्यात खोलवर येणारा कंटाळा,मधूनच उद्भवणारे नैराश्य,कोणाशीच बोलू नये.मजा म्हणजे एखाद्या ठिकाणी जावून दारू पिणं आणि मनातलं बोलण्या ऐवजी वरवरचं टपोर बोलणं.यातून त्यांना सोबत मिळत नाही.
    सहजीवनासाठी लागणारी सोबत त्यांना आज तरी लग्नातूनच मिळणार आहे.दुसरे पर्याय असले तरी ते तितकेसे समाजमान्य नाहीत.या मुलांना वेळ नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते अनेक वेळ फेसबुक वर असतात.इंटरनेटवर सतत काम करत असतात,सिनेमे,मॉल यांना भेटी देत असतात.ही मंडळी कोणत्या जगात वावरतात हे पालकांना कळत नाही.म्हणून ते ही बिचारे घाबरत घाबरत त्यांना विचारतात की ,बाबारे लग्न करायचे असेल तर सांग,कोणी मुलगी बघितली असेल तर सांग.पण लग्न कर आम्ही तुला सगळी मदत करतो.पण यांचं एकच पालुपद वेळ नाही
     आजच्या या धावत्या काळात सोबत,जोडीदार,जीवनसाथीची सगळ्यात जास्त गरज आहे कारण आज व्यक्त होण्यासाठी साधनं जरी भरपूर असली तरी तिथं दिसतात ते फक्त मुखवटे.आपला खरा चेहरा,आनंद,दुःख सांगण्यासाठी एका समजूत दाराचीच गरज असते.

No comments:

Post a Comment