Tuesday, 7 February 2012

ओळखा स्वतःला

                           ओळखा स्वतःला
स्व-ओळख ही आज प्रत्येक क्षेत्रात किती महत्वाची आहे,हे आपण रोज अनुभवतो.शाळेतल्या मुलांपासून ते कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला स्व ओळख असणे त्या व्यक्तीसाठी आणि समाजासाठी खूप महत्वाची आहे. स्व ओळख म्हणजे मी डॉक्टर आहे,इंजिनियर,गृहिणी,लेखक,पत्रकार,वकील,दिग्दर्शक,अभिनेता आहे.अशी नाही.ती तर तुमच्या व्यवसायाची ओळख आहे.अर्थात तो  जर तुमच्या स्वभावा नुसार निवडला  असेल तर तुम्ही कसे आहात याचा विचार तुम्ही याआधी केला आहे असे म्हणता येईल.पण बहुतेक वेळा आपण आपला व्यवसाय हा त्यातून जे आर्थिक उत्पन्न मिळते त्या नुसार निवडतो .फार क्वचित आपण आपल्याला आवडणार काम करत असतो.तर मी कसा आहे? मी कशी आहे?
    आपण आपल्या व्यवसायाची  ओळख प्रत्येक ठिकाणी वापरतो. ती वरवरची ओळख लग्नासाठी तर अगदी चलनी नाणं असतं.खरतर विवाह’,लग्न या गोष्टी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आणि समाजासाठी खूप महत्वाच्या आहेत. समाजाचे स्वास्थ काही अंशी विवाह संस्थेवर आधारित आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    लग्न ही जशी हौसेमौजेची घटना आहे तशीच ती अत्यंत जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने करण्याची गोष्ट आहे.आज सह-शिक्षणामुळे मुलं-मुली एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात. त्यांना एकमेकांचे वर-वरचे स्वभाव साधारणपणे माहित असतात.तरीही लग्न करतांना मुलगा आणि मुलगी कडून ज्या अपेक्षा केल्या जातात त्या फार वेगळ्या असतात,काही वेळेस तर विचित्र असतात. असं का होतं? कारण त्यांनी स्वतःलाच  ओळखलेलं नसतं.जसा-जशी मित्र-मैत्रीण मिळेल त्याप्रमाणे आपण वागत जातो.पण आपल्याला नक्की काय हवं आहे याचा शोध घेत नाहीत.
       खरतरं शिक्षण घेतांना आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे.पण सभोवतालच्या स्पर्धेचा रेटा एवढा जोरात असतो की आपण प्रवाहाबरोबर कुठेतरी वाहत जातो. माहितीच नसतं आपल्या भावना कशा आहेत.त्या आपल्याला ओळखता यायला हव्यात. म्हणजे आपला स्वभाव कसा आहे? बोलका,बडबडा,आनंदी,शांत,चिडका,रागीट,गंभीर,तार्किक,घुमा,मस्करी करणारा.कसे आहोत आपण? सहज एक खेळ म्हणून तुमच्या नावा बरोबर तुमचा स्वभाव जोडा.उदा.नील-रागीट,नील-आनंदी,खेळकर.जोडी कशी वाटते बघा. योग्य असेल तर प्रश्नच नाही.पण अयोग्य वाटत असेल तर बदलायला हवी ना? जोडीदाराचा शोध घेतांना आधी स्वतःला शोधायला हवं म्हणजे आपल्याला योग्य असा जोडीदार निवडणे सोप्प होईल.
    एक गंमत म्हणून तुम्हांला एक अनुभव सांगते.आम्ही विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिरात बसलो होतो..तेव्हा अनेक विषयावर चर्चा चालल्या होत्या. याबरोबरच स्वतःची ओळख हा ही विषय होताच. तर काही मुलं पटकन म्हणाली,’.पुरुष रागीटच असतात’. आम्ही विचारलं कसा? तर उत्तर काहीच नव्हतं.खरतर आपला स्वभाव हा जन्मजात नसतो तो संगोपनातून येतो.यात आपण जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून काय मिळाले? आणि संगोपनातून आपण काय घेतो? याचाही विचार करायला हवा.म्हणजे मुलं-मुली काही कामं किंवा सर्वच कामं सहज करू शकतात. हे ही पटेल.
     एकदा आपल्याला आपला स्वभाव कळला की आपण जोडीदाराचाही स्वभाव समजून घेवू शकतो. माझा स्वभाव जर चिडका असेल तर त्याचाही रागीट आहे हे समजू शकतो. मी जर चिडक्या स्वभावावरून थोडा खाली येवू शकत नसेल तर तो ही थोडा कमी रागीट होईल याची अपेक्षा करू शकणार नाही.
   लग्न म्हणजे केवळ नवीन घर,दाग-दागिने,कपडेलत्ते,सासुरवाडीचा मानपण,सन्मान,कोडकौतुक नव्हे. तर दोन स्वभाव,दोन मनं यांचे मिलन. त्यासाठी अनेक बदल दोघांनीही करणे गरजेचे आहे. कारण आपलं घर हे हसतम-खेळतं अंगण हवं की राग-लोभाचा पिंजरा हवा. आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. म्हणून स्वतःला ओळखायला शिका.कारण आपण स्वतःला ओळखलं तरच जोडीदार कशा स्वभावाचा हवा हे आपल्याला कळेल.नाहीतर मग कितीही स्थळं बघा एकही क्लिक होणार नाही.कारण आपल्याला नक्की काय पाहिजे हेच आपल्याला कळत नाही.चला शोध घेवू या स्वतःचा.
No comments:

Post a Comment