Tuesday 28 February 2012

बदल व्हायला पाहिजे ना






          बदल व्हायला पाहिजे ना.
      काल मी एका विवाह सोहळ्याला गेले होते.खरच तो एक सोहळाच होता.सगळेजण आनंदात होते.आपापलं काम करत होते.मजेत होते.मलाही मस्त वाटत होतं कारण उन्हाळ्यातलं पहिलं आईस्क्रीम माझ्या हातात होतं.त्यामुळे मला गार-गार वाटत होतं.तर अचानक मागून आवाज आला की सगळं बदलयं.म्हणजे काय बदलयं ? तर राहणीमान,मजा करण्याच्या पद्धती,घरातील सर्व आधुनिक फर्निचर आणि उपकरणे.नवीन आलीत म्हणजे बदल झाला.असं त्यांना म्हणायचं होतं.अजून एक आवाज होता तो माणसामाणसातील संपर्काची साधने बदलली.आणि लगेच गाडी नव्या पिढीवर आली,तरूण मुला-मुलींचे लग्न यावर आली.त्यांच्या गंमती-जमती सांगायला सुरुवात झाली.मग सगळ्यांचा उत्साह अगदी ओतू जात होता.मुला-मुलींच्या लग्नाच्या गोष्टी निघाल्या.प्रत्येकजण आपला अनुभव तावातावाने सांगू लागला.
      ते सगळेजण काय म्हणत होते याचं थोडक्यात सार सांगते.लोक योग्य प्रतिसाद देत नाही.फोनवर नीट बोलत नाही.स्थळ आवडलं की नाही याचा निर्णय लवकर देत नाही.टांगून ठेवतात.आम्हांला वेळ नाही असं सांगतात.फोटो पाठवा म्हटलं तर देत नाही.पत्रिका आधी बघायची नाही असं म्हणतात नंतर बघतात.येतो म्हणतात आणि पण येत नाही.अशा अनेक गोष्टी ते सांगत होते.त्या गरम चर्चेने माझं आईस्क्रीम पार वितळून गेलं.पण आता मी या चर्चेतून काही उत्तर मिळतं का ते बघत होते.पण सगळेजण चिडीला आले होते.मग त्यांनी शहरानुसार लोकांना नावं ठेवायला सुरुवात केली .पुण्याची माणसं अशी,नाशिकची तशी.मुंबईची तर आणखीनच वेगळी.प्रत्येक शहराबद्दल तक्रार होती.
      या तक्रारीत अजून एक गोष्ट लक्षात येत होती ती म्हणजे सगळ्यांना बदल व्हायला हवा होता पण दुसऱ्यामध्ये. ते स्वतः कोणीच बदलायला तयार नव्हते.कारण ते ही मुला-मुलीचे पालक होते. ते स्वतः दुसऱ्या कडून ज्या अपेक्षा करतात त्या गोष्टी करतात का? हे मात्र बघत नव्हते.त्यांना बदल हवा होता पण समोरच्या व्यक्तीकडून.कसं शक्य होतं ते? कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतः पासूनच व्हायला पाहिजे.ती जबाबदारी ते घ्यायला मात्र टाळत होते.
  घरामध्ये असलेली २८-३० वर्षाची मुलं-मुली लग्न न करतात वावरतात तेव्हा हे पालक अधिकच चीड-चीड करतात. कारण नक्की काय केलं म्हणजे ते मुला-मुलीचे लग्न वेळेत होईल आणि त्यासाठी त्यांना फार तोशीस पडणार नाही.असं त्यांना वाटत असतं.अर्थात यात त्यांची खूप मोठी चूक आहे असं नाही.कारण सभोवताल इतक्या झपाट्याने बदलत आहे.त्यामुळे हे ही काही प्रमाणात बदलतात पण ते त्यांच्या लक्षात येत नाही.मुलाने जर सांगितलं की मला ना तुम्ही सांगाल त्या मुलीशी आणि आपली संस्कृती जपणारी मुलगी हवी. तर पालक खूश होतात आणि बघा आमचा पिंट्या कसा बदलला नाही याची फुशारकी मारतात. पण पिंट्याची  आवड ही बदलत असते.आज जर त्याला पुरणपोळी आवडत असेल तर काही दिवसांनी त्याला चायनीज आवडायला लागेल.मुळात मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने काम केले पाहिजे.कारण प्रत्येकजण कामात असला तरी लग्नाचे वय तेच राहत नाही.वय वाढले अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण आणि आपली कामं यांची जोडी तर इतकी वर्ष चालूच आहे पण मुलांसाठी एक योग्य जोडीदार शोधण्याची वर्ष मात्र फार कमी आहेत.म्हणून योग्य ते नियोजन करून आणि मुला-मुलींनी स्वतःला ओळखून,वास्तवादी अपेक्षा ठेवून पालकांशी संवाद साधायला हवा.आणि पालकांनी सुद्धा त्यांच्या वेळचं कसं होतं हे अनेक वेळा न सांगता आज कोणती कृती करणं महत्वाची आहे हे बघून संवाद साधायला हवा.
    मुलां मध्ये झालेले मानसिक बदल लक्षात घेणे गरजेचे आहे.तरच त्यांच्या लग्नासाठीच केवळ नाही तर समाजातील संवाद टिकवण्यासाठी आपण काही करू शकू.आपण सर्वचजण भेटलो की म्हणत असतो की आज कोणी कोणा कडे जात नाही,गप्पा रंगत नाही,उगीचच कोणी कोणाच्या घरी जात नाही,नातेवाईक राहयला येत नाही.वगैरे.पण या सगळ्या गोष्टी आपण करतो का? दुसऱ्याने आपल्याकडे यावे म्हणून बोलावणं करतो का?गप्पा रंगतील असा वेळ आहे असं दाखवतो का?अशा प्रकारचं वातावरण तयार करायला आपण कमी पडतो.म्हणूनच बदल हवा असेल तर स्वतःपासून बदलायला सुरुवात करायला हवी. नाही का?  

No comments:

Post a Comment