Friday 2 March 2012

बा,मना सुंदर हो.






बा,मना सुंदर हो. www.daptaryswiwah.com
  सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही.सगळ्यामध्ये काही ना काही सुंदर असतेच. फक्त ते आपल्याला जाणवायला पाहिजे आणि अलीकडच्या आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ते आपल्याला carry करता यायला पाहिजे.तुमच्या मनात येत असेल की आहो आपलं सौंदर्य दुसऱ्याला जाणवलं तर काही उपयोग नाही तर काय त्याला चाटायचं आहे.काय हे? आपण आपल्याबद्दल एकही चांगला विचार करू शकत नाही. सतत आपण दुसऱ्याच्या डोळ्यांनीच स्वतःकडे बघायचं? माझ्या मते जेव्हा आपण स्वतःला सुंदर दिसू तेव्हाच इतरांचे सौदर्य आपल्याला दिसेल ना?
   मी सौंदर्यावर एवढी घसरली आहे कारण लग्नाच्या बाजारात सुंदरतेच्या खूप गप्पा होतात,त्यावर जोडीदार निवडण्याचे निर्णय घेतले जातात.एखाद्या व्यक्तीला तिच्या बाह्य रूपावरून नाकारले जाते. तेव्हा त्या घरातील सर्वजण खूप दुःखी होतात.मला दिनेश भेटला तेव्हा त्याने खूप फुशारकीने सांगतिले की मी २५ मुली केवळ त्या सुंदर नाहीत म्हणून नाकारल्या. तो म्हणतो मला सुंदर आणि स्मार्टच मुलगी हवी.म्हणजे कशी? हे त्याला कळलेले नाही.तर मितालीने पण २० मुलांना नाकारले कारण ते handsome नव्हते.काय सांगणार या दोघांना? त्यांचे आई-वडील तर पार मेटाकुटीला आले आहेत.पण मी एक गोष्ट सांगितली.
     एका क्लब मध्ये एक पार्टी चालू होती.एका सुंदर स्त्रीने पार्टी मध्ये प्रवेश केला. तिची त्वचा अगदी नितळ होती,कपडे उंची होते,तसेच तिची फिगरही छान होती. आश्चर्य म्हणजे तिलाही तसेच वाटत होते. लोक तिच्याजवळ यायचे आणि पटकन निघून जायचे.
       त्यानंतर एक बुटका,बऱ्याच मिशा असणारा पुरुष पार्टीला आला. त्याच्याभोवती अनेक लोकांचा घोळका जमतो,आणि सहजपणे संभाषण सुरु होते.
   काय चाललयं? वगैरे.संपूर्ण पार्टीतील लोक त्याच्या भोवती गोळा होतात आणि तिथूनच हास्याचे फवारे फुटत असतात.लोक त्याच्या सहवासात खूप आनंदी होतात.
        तुम्ही केवळ शरीराने सुंदर असून चालत नाही तर मनाने ही सुंदर असायला लागते. आपण सर्वजण आपले शरीर सुंदर करण्यासाठी अनेक गोष्टी करतो.जिम मध्ये जावून व्यायाम करतो,शरीराचा काही भाग रंगवतो,शिवतो.चेहरा वेगवेगळी कोस्मेटिक वापरून आकर्षक करतो.तसेच प्लास्टिक सर्जरीने सुंदर बनवतो. पुरुष सुद्धा केसांचे रोपण करू शकतात. सुंदर दिसण्यासाठी वाटेल त्या गोष्टी आपल्याला करता येतात.
   पण तुमच्या मनाच्या सौदर्याच काय? ते सुंदर व्हावे म्हणून काही प्रयत्न आपण करतो का?कंटाळलेल्या मनाबरोबर महान सौंदर्य हे ही कंटाळवाणे च वाटते. तुम्ही कोणाचे लक्ष वेधून घेवू शकाल पण ते टिकवून ठेवू शकणार नाही.
    आपण जन्मतःच विशिष्ट आकाराचा चेहरा आणि शरीर घेवून येतो. आपण काही मर्यादे पर्यंत आपले शरीर सुंदर करू शकतो . पण आपले मन सुंदर करण्यासाठी मात्र आपल्याला खूप काही करता येते.जर आपण नैसर्गिकरित्या सुंदर असू पण आपले  मन कंटाळवाणे असेल तर ती एक शोकांतिका आहे. आपण आपले सौंदर्य वाया घालवित आहोत.हे म्हणजे कसं होईल माहित आहे का? एक सुंदर महागाची कार खरेदी करायची आणि त्याच्यात पेट्रोलच घालायचे नाही असं होईल.

      आपण म्हातारे झाल्यावर आपले शारीरिक सौंदर्य लोप होत जाते. पण मनाच्या सौंदर्याला वयाचे बंधन नसते,ते स्वतंत्र असते आणि उलट शहाणपणा आणि अनुभवामुळेच ते अधिकच खुलते.खूप जण शारीरिक सौदर्यासाठी भरपूर वेळ,पैसा,श्रम खर्च करतात. पण स्वतःचे मन सुंदर करण्यासाठी फार थोडे श्रम आणि वेळ खर्ची पडतो.
    मनाचे सौंदर्य हे आपण  करत असलेल्या संवादातून दिसते. आपण आपले मन सुंदर करू शकतो.म्हणजेच जोडीदार निवडतांना तो मनाने सुंदर आहे की नाही हे बघा कारण तेच सौंदर्य यशस्वी संसारास मदत करणार आहे.
  

No comments:

Post a Comment