Saturday 11 February 2012

आया मौसम


आया मौसम
    वर्षभरात जसे आपण तीन ऋतू अनुभवतो,त्याचप्रमाणे दरववर्षी  हा लग्नाचा मोसमही अनुभवतो. निसर्गातल्या बदलत्या हवेबरोबरच प्रत्येक शहरात एक वेगळाच हंगाम इतर अनेक हंगामा बरोबर सुरु होतो. तो म्हणजे लग्नाचा हंगाम.लग्नाचा मोसम. तुम्ही भारतातल्या कुठल्याही शहरातले राज्यातले असा. दिल्ली,कलकत्ता,मुंबई,पुणे,नाशिक.तुम्ही ही लगीन सराईचा अनुभव निश्चित घेत असाल.
   लग्न ज्याला करावंस वाटतं त्यांनं जरूर करावं.पण ते करतांना खूप डोळसपणे करावं. त्याच्या विषयीच्या आपल्या अपेक्षा जास्तीत जास्त स्पष्ट करून घ्याव्यात.आधी स्वतःसाठी आणि मग जोडीदारासाठी आणि इतरांसाठीही. लग्न ही जरी प्रत्येकाची वैयक्तिक आणि खाजगी गोष्ट असली तरी त्याचा परिणाम समाजावर होतो.म्हणून ती सामाजिक संदर्भ असलेली घटना आहे.
     स्त्री-पुरुषांना एकत्र यावसं वाटणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्या एकत्र येण्याला समाजाची मान्यता असावी म्हणून’लग्न’ लग्नातून सहजीवनाची अपेक्षा असते.म्हणजेच पती-पत्नींना एकमेकांविषयी प्रेम,विश्वास,आदर या भावना हव्यात. शिवाय माणूस म्हणून प्रवाही,बदलत राहण्याची,विकसित होण्याची जाणीव हवी. ओढ हवी. हे ज्या लग्नात जास्तीत जास्त प्रमाणात त्या दोघांना मिळतं ते सुखाचं लग्न.
     पण या ‘लग्न’ या गोष्टीतून पैसा आणि सुंदर शरीराची,चेहरा आणि त्याची किंमत करणारी प्रतिमा पुढे येत आहे.मुलगी तर ४-५ लाख मिळवत असेल तर मुलाने १० लाख मिळवले पाहिजे किंवा मुलगा एवढा स्मार्ट आहे.तर मुलगी निदान गोरी हवी. आता आपल्या सर्व समाजापुढे खरं आव्हान आहे.आपण केवळ शरीर सौंदर्याला महत्व देणार की व्यक्तिमत्वाला ,बुद्धीला,कर्तृत्वाला आणि त्यातून जो आत्मविश्वास येतो त्याला सौंदर्य  मानणार? शारीरिक सौंदर्य जन्मतः आपल्याजवळ असतं किंवा नसतं. ते इतर गुणांसारखं प्रयत्न साध्य नाही. ते बाह्य सौंदर्य आहे. निसर्गाच्या नियमानुसार ते सौंदर्य जन्मभर टिकणार नाही.आणि म्हणून ५/१० वर्षाच्या पलिकडे या सौंदर्याला फार किंमत नाही.याउलट जे रूप,जे शरीर. जन्मतांना आपण घेवून आलो त्याचा स्वीकार करून ते गुणांनी,कर्तृत्वानं सुंदर करण्याची आपली धडपड आपल्याला आयुष्यभर साथ करील. विश्वास येईल आणि अशीच व्यक्ती जोडीदार म्हणून आपल्या सहजीवनात माधुर्य आणेल. आपल्या कलेमुळे,बुद्धीमुळे आणि अशाच काही गुणांमुळे नामवंत झालेल्या माणसांच्या रुपांचा विचार आपण करायला हवा. लग्न करतांना काहीजणांना उंचीतला फरक अजिबात चालत नाही. खूप बुटकी किंवा मुलापेक्षा उंच मुलगी अर्थात मुलीलाही तिच्यापेक्षा कमी  उंचीचा मुलगा आवडत नाही. तेव्हा ते लग्नाची यशस्विता उंचीवर ,वरवरच्या शारीरिक गोष्टींवर मोजतात. पण ह्या गोष्ठी अधिक काळ परिणाम करत नाही. बघा.श्री.अभिताभ आणि जया बच्चन आदी.
   मुलगा-मुलगी एकमेकांना अनुरूप असणे म्हणजे काय? तर ते शारीरिक रुपाने आणि पैशाच्या दृष्टीनें अनुरूप आहेत का? याचा बरेचजण शोध घेतात.मग अनेकांना ते नकार कळवितात आणि आमच्या योग्य जोडीदार नाही म्हणून निराश होतात. आपण या सौंदर्याच्या सापळ्यात किती काळ अडकणार आहोत? किती काळ रुपावर आपली किंमत ठरविणार आहोत? गुणांवर आपण कधी लक्ष देणार? गुणांची व त्यामुळे सहजपणे आलेल्या आत्म्विशावासाची किंमत याहून मोठी आहे. बाजारात गुणांच्या रुपाला केव्हा किंमत यायची ती येवो. आपल्या जीवनात आम्ही कर्तृत्व,आत्मसन्मान यांचीच सोबत शोधू.
    सौंदर्याशी वैर नाही,पण ते एक साधन,हत्यार किंवा वस्तू बनवू नये. एवढेच. हे एकदा समजलं की सोबत शोधणे,जोडीदार शोधणे अवघड जाणार नाही. लग्न करण्याचे आपले वय  झालेच आहे,त्या नैसर्गिक वाढीत आपल्या या जाणीवपूर्वक वाढीचा वाटा प्रयत्नपूर्वक असावा असं वाटते. ही वाटचाल सोपी नाही आणि तरीपण तिथे खूप आनंद आणि अर्थपूर्णता आहे. आपणही यात सामील झालात तर आनंदाने नवीन क्षितिजाला सामोरे जाता येईल.

No comments:

Post a Comment