Thursday 16 February 2012

स्व-दृष्टिकोन


स्व दृष्टिकोन
     स्त्री –पुरुष,मुलगा-मुलगी यांना आज लग्न करतांना काहीवेळेस समान तर काहीवेळेस वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. लग्न करतांना, जोडीदार निवडतांना ते समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तपासून बघतात आणि हे नाही,ते नाही या नकारात्मक भावनेने बघतात. त्यामुळे बहुतेक वेळा निराशा निर्माण होते.
   एका लहानशा गोष्टीने मला नक्की काय म्हणायचे आहे, ते स्पष्ट होईल.
एका लहानशा गावात छान सकाळ होवू लागली होती,सूर्य उगवत होता. एक घोडेस्वार येवून थांबला,आणि त्याने वेशीजवळ बसलेल्या एका वृद्धाला विचारले,’मी या गावात राहायचे ठरवून आलो आहे.जुनं गाव मी सोडून दिलंय. तर या गावातले लोक कसे आहेत ते तुम्ही सांगाल का?
    तेव्हा त्या वृद्धाने अतिशय समजूतदारपणाची गोष्ट विचारली. तो म्हणाला,तू जे गाव सोडून आलास त्या गावातले लोक कसे होते?
  तो माणूस म्हणाला,त्यांचं नाव नका घेवू. त्यांच्या आठवणीसुद्धा नको वाटतात. त्या गावातले लोक फार दृष्ट  आणि वाईट आहेत. त्यांनी मला इतका त्रास दिला की, त्यामुळे मला गाव सोडून यावं लागलं.
  तो वृद्ध माणूस म्हणाला,मित्रा तू दुसऱ्या  कुठल्या तरी गावाला जा. या गावातले लोक तर त्यापेक्षाही वाईट आहेत.
   तो घोडेस्वार पुढे निघून गेला. त्यानंतर एक बैलगाडी येवून थांबली. तिच्यात एक कुटुंब होतं. त्यातल्या लोकांनाही त्या वृद्धाला विचारले की या गावातले लोक कसे आहेत? आम्ही आमचं गाव सोडून आलो आहोत आणि या गावात राहायची इच्छा आहे.
   वृद्धाने पुन्हा तोच प्रश्न विचारला,’ तो म्हणाला,मला सांगा,तुम्ही जो गाव सोडून आला तिथले लोक कसे होते?
     गाडीतला माणूस म्हणाला,त्याचं नाव घेतलं,त्यांची आठवण झाली की माझं ह्र्दय  आनंदानं भरून जातं. त्यांच्या सारखी भली माणसं या धरतीवर क्वचितच असतील. माझं मन भरून आलं आहे.
   तो म्हातारा म्हणाला,या आम्ही तुमचं स्वागत करतो. या गावातली माणसं तुम्हांला तुमच्या त्या गावापेक्षाही चांगली वाटतील.
  ही लहानशी गोष्ट तुम्हांला सांगायची होती. गाव तेच होतं.पण दोन वेगवेगळ्या माणसांना वृद्धाने वेगवेगळी उत्तरे दिलेली होती. गाव कसं असेल हे कशावर अवलंबून आहे? मी कसा आहे याच्यावर ते अवलंबून आहे.
   अनेक मुलं-मुली लग्न ठरवितांना ९०-१०० मुलं-मुली पहिल्या. हे अभिमानाने सांगतात. ते पाहतांना त्यांनी स्वतःच व्यक्तिमत्व तपासलेलं असतं का? कोणत्या फुटपट्टीने ते दुसऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तोलतात. काय शोधत असतात ते? ते त्यांना तरी नीट समजलेलं असतं का? आपल्या व्यक्तीमत्वात जे नाही ते आपल्याला सगळं जगही नाही देवू शकत आणि आपल्या व्यक्तीमत्वात जे आहे ते सगळ्या जगाची ताकदही आपल्याकडून हिरावून नाही घेवू शकत. तुम्ही समजूतदार नसाल,उदार नसाल तर दुसरं कोणी तुम्हांला समजून घेईल,तुमच्या विषयी उदार राहील अशी अपेक्षा करू नका. तुम्ही चिडके,रागीट आहात,अशांत आहात ते तुमच्या व्य्क्तीम्त्वातल्या कुठल्यातरी मुलभूत चुकीमुळे. ही गोष्ट जर लक्षात आली नाही तर आपण परिस्थिती बदलण्यात,व्यक्तींना बदलण्यात आयुष्य वाया घालवतो आणि स्वतःला बदलण्याकडे आपली दृष्टीच जात नाही.
   जोडीदार निवडतांना ही स्वतःतला बदल फार महत्वाचा आहे. तो झाला की ,समोरच्या व्यक्तीची उंची,सौंदर्य,अंगकाठी,शिक्षण,पैसा या पलिकडे आपण पाहतो आणि विचार,भावना,संवेदनशिलता यांच्या साहय्याने आपल्यासाठी योग्य जोडीदाराची निवड करतो. कारण या गोष्टींच्या साहय्याने जेव्हा आपण जोडीदाराची निवड करायला जातो तेव्हाच तो आपल्याला बरोबर क्लिक होतो. Best Luck.वरील गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की जीवनाकडे पाहण्याचे ढंग,जीवनाविषयीची नजर,attitude दोन प्रकारचे असू शकतात. तुम्हीच ठरवा आपण जीवनाकडे कसं बघणार ते?
  

No comments:

Post a Comment