Wednesday 15 February 2012

चर्चा हवीच.


मला मुळी अशा रूढ पद्धतीने लग्नच करायचं नाही.माझं असं,माझं तसं.असं  प्रज्ञा तावातावाने आम्हांला सांगत होती. तिला अनेक जणांनी साथ दिली.विवाह पूर्व मार्गदर्शनाच्या  कार्यशाळेचा शेवटचा टप्पा चालू होता. तेवढ्यात या सगळयांनी एकच कल्हा केला. म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एका रविवारी कॉलेजमध्येच 'लग्न' या विषयावर मोकळेपणी बोलण्यासाठी एकत्र जमायचं आणि खूप बोलायचं.
   विवाह,कुटुंब या समाज जीवनातल्या महत्वाच्या संस्था आहेत. लग्न ही महत्वाची आणि प्रत्येकाला करून बघावी अशी वाटणारी घटना आहे. असं मानतात. तरून मुला-मुलीना लग्नासंदर्भात अनेक प्रश्न पडतात,काही बदल करावेसे वाटतात. तरीपण या एका महत्वाच्या घटनेविषयी फारशी देवघेव होत नाही. तरुण मुलंही आपसात या संदर्भात बोलत नाही. काहीजण मात्र गंभीरपणे व प्रामाणिकपणे बोलतात.
    आमच्या "या" या आमंत्रणाला मान देवून कॉलेजच्या आवारात अनेकजण जमले होते. त्यात नवविवाहिता  बरोबरच अविवाहित,आजी-आजोबा शोभतील असेही लोक आले होते. यातील काहींना  निमंत्रित वक्ते बोलण्यासाठी  हवे होते. पण आम्ही त्या कार्यक्रमाचे स्वरूप चर्चेचे ठेवले होते. त्यामुळे आमच्या एका मैत्रिणीने प्रत्येकाला बोलण्याची ,विचार मांडण्याची संधी मिळेल.अशा पद्धतीने संचलन केले.त्यामुळे ज्यांना 'लग्न' या घटनेबद्दल आस्था आणि काळजी होती ते प्रत्येकजण संवाद साधू लागले. आमच्या असे लक्षात आले की खूप जणांना बोलायचं आहे,त्यांच्या मनात काय काय खदखदत आहे. लग्नासाठी निवड करतांना येणाऱ्या अडचणी,घुसमट ,अपमान खूप आहे.त्यात अहंकाराचे पाडाव ही भरपूर आहेत.त्यात वरपक्ष,घराणं ,सांपत्तिक स्थिती,वधूपक्ष याही गोष्टींचा समावेश आहे. तसेच दोन पिढ्यातील अंतरामुळे येणारा विषम दृष्टीकोन आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत.
   हे सगळं ऐकतांना ,बोलताना आमच्या लक्षात येत होतं की असा एक गट कायमस्वरूपी एकमेकांना भेटायला हवा. त्यांनी चर्चा करून मार्ग काढायला हवा. म्हणजे काही कृतीशील योजना कार्यान्वित होईल आणि वैचारिक स्पष्टता येईल. मला जोडीदार कसा हवा हे बघतांना स्वतःची ओळख पटायला हवी.मला केवळ खाणं-पिणं ,पोषाख यापलीकडे काय आवडत.माझी जीवनशैली -कार्यशैली काय आहे हे कळायला हवं.
   तसेच लग्न/विवाह का केला जातो याची यादी केली तर काय दिसेल? मुलींच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला जीवापाड प्रेम करार,आधार देणारा,सोबत देणारा जोडीदार हवा असतो.स्वतःच आपलं 'घर'हवं असतं. आई-वडिलांची काळजी कमी करायची असते. लहान बाळाची आवड असते. मुलांच्या दृष्टीने विचार केला तर एक हक्काचं माणूस मिळवायचं असतं किंवा चारचौघांसारखा संसार करावा वाटतो. एका छान जोडीदाराची सोबत हवी वाटते.
   सोबत हवी असं दोघानंही वाटते. पण निवड कशी करायची हे कळत नाही. पण जन्माचा जोडीदार निवडतांना रूप सर्वात महत्वाचं नाही हे लक्षात ठेवायला हवं फक्त बघताक्षणी नकोसेपणाची भावना मनात येत नाही ना? हे बघायला हवं. किमान आर्थिक सुरक्षितता आणि त्यासाठी मुलभूत शिक्षण कर्तृत्व यांचाही विचार ओघानच आला. आरोग्याचा विचारही करावा.पण या सर्वांच्या पलीकडे अजून कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात .उदा. वाचन,संगीत,खेळ,प्रवास,सामाजिक काम,नोकरी-करीयर ,अभ्यास   इ. किंवा natk-सिनेमा ,दारू ,सिगारेट ,खरेदी इ. यासारख्या कुठल्या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या वाटतात आणि त्या जोडीदाराला फालतू किंवा अत्यंत गैरलागू वाटत असतील तर त्याबाबत एकमेकांशी बोलायला हवं .कारण तारुण्य सुलभ शारीरिक ओढ आणि एकूणच संसारिक जीवनातील नवलाईचा पहिल्या काही वर्षांचा काळ ओलांडल्यावर खर वास्तव दिसायला लागतं.म्हणूनच हे सारं प्रत्यक्षात दिसण्यापुर्वी लग्न ठरवतांना वरील गोष्टींचा मोकळेपणी विचार करायला हवा.कारण आपल्याला लग्न केवळ टिकवायचे नाही.तर त्यातून ताज्या टवटवीत माणूसपणाचा अनुभव घ्यायचा आहे. प्रसन्न अशा माणूसपणासाठी लग्न करायला हवं .म्हणून जे आवडत नाही,नकोसं वाटतं त्यावर टीका करण्यापेक्षा खुल्यामनाने विचार करायला हवा आणि मार्ग शोधायला हवा.

No comments:

Post a Comment