Wednesday 18 March 2020

सहजीवन म्हणजे काय असते

www.daptaryswiwah.com
सहजीवन म्हणजे काय असते हो..!
सहजीवन म्हणजे लग्नानंतर एकत्रितपणे जगण्याचे ते सुंदर सुंदर क्षण..
हातात हात घेत एकमेकांना दिलेली वचने..
तसेच एकमेकांची घेतलेली काळजी,एकमेकांप्रती असलेले प्रेम,आस्था आणि जिव्हाळा...
अहो हेच तर असते सहजीवन..!
दोन भिन्न कुटुंबातून आलेले भिन्न स्वभावाचे..भिन्न संस्काराचे..भिन्न व्यक्तिमत्वाचे ते दोघे लग्नानंतर एकत्र नांदू लागतात आणि सुखाचा शोध घेत जातात ...
काही खरंच सुखी होतात..काहींना तो केवळ सुखाचा आभास वाटतो तर काही जण सहजीवनाच्या वाटेवर सदैव सुखाचा अविरतपणे शोध घेत जातात..
असे हे खूपसे गमतीजमतीचे हे नाते असते.. तितकेच हवेहवेसे वाटणारे..जीवनावर भाष्य करणारे असे हे सहजीवन अगदी प्रत्येकाचे वेगवेगळे असते..
तुमच्या सहजीवनाविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
आमचा त्यामागील उद्देश्य हाच की त्यातूनच तुम्हाआम्हा सर्वांना सुखी सहजीवनाचा मूलमंत्र लाभावा..
आणि सहजीवनाचे कोडे अलगदपणे उलगडावे..
मग सांगताय ना मनातलं..?
आमच्यातर्फे तुमच्याशी तुमच्या सहजीवनाबद्दल संवाद साधत तुम्हाला बोलतं करणार आहेत स्वाती पाचपांडे ..ज्यांचे आजवर विविध विषयांवरील वैचारिक लेख विविध वृत्तपत्रात तसेच मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत..
मॅनेज मॅन भाग १ आणि भाग २ हे मॅनेजमेन्ट वरील दोन पुस्तके तसेच रोजच्या जीवनातील अनुभवांवर *सुनंदिनी ही पुस्तके प्रकशित झाली आहेत.त्या एक उत्तम संवादक आहेत.
आता स्वाती ह्या तुमच्या सहजीवनाला शब्दरूप देणार आहेत आणि ते शब्दांकन आम्ही www.daptaryswiwah.com च्या फेसबुक पेज वर पोस्ट करणार आहोत.
सदर उपक्रमात सहभागी व्हायला आपल्याला आवडेल का हे आम्हाला नक्की कळवा.


Thursday 19 July 2012

मिडास राजा

www.daptaryswiwah.com परवा ऑफिसमध्ये सुनिताचा फोन  आला मला madam शी बोलायचे आहे.  मला ट्रान्स्फर केल्यावर तिने बोलायला सुरवात केली.madam २००८ मध्ये तुमच्याकडे माझ registration केल होत त्यावेळेस मी २९ वर्षाची होते व त्यावेळेस तुम्ही मला योग्य वयात लग्नाचे फायदे खूप कळकळीने समजावूनसांगत होतात परंतु मी त्यावेळेस  माझ्या carrier मध्ये खूप जोरात होते व सतत नवनवी प्रमोशन्स घेत होते व त्यामुळे मला अजिबात लग्नाचा विचार करावा वाटत नव्हता.  तुमच्यासारखेच  आई वडील मला वेळोवेळी सांगत होते व ह्या विषयावर घरात चर्चा सुरु झाली कि  आमच्यात  खूप भांडण व्हायचं व त्यानंतर महिनाभर आमच्यात घरात एकमेकाशी अबोला  असायचा , त्यावेळेसच माझ्या  काही मित्र मैत्रीणींच लग्न ठरत होते अथवा काहीची   नुकतीच ठरलेली  होती .  त्यामुळे शनिवार, रविवार आम्ही सगळे एकत्र येवून खूप मजा करायचो   exhibition ला जाणे सिनेमा,  हॉटेलला, पिकनिकला जाणे अशी आम्ही खूप धमाल करायचो . पाच दिवस मान मोडून काम करायचं व दोन  दिवस मित्रांबरोबर मस्त धमाल करायचं अस छान आयुष्य चाललं होते.  हातात काम होत, काहीतरी करण्याची जिद्द होती. हातात भरपूर पैसा होता व मजा करायला मित्र मैत्रिणी होते. ते दिवस खूप पटकन गेले.  हळूहळू सर्व मित्र मैत्रीणींचे लग्न झाले व त्यामुळे शनिवार, रविवार हे ते फक्त त्याच्या कुटुंबासाठी राखून ठेवायला लागले.  मी कोणालाही आता फोन केला कि पिकनिकला जाऊया सिनेमा, नाटक, exhibition ला जाऊया पण प्रत्येकाचेच काहीतरी कारणाने नाही होत अथवा कुटुंबाबरोबर आधीच त्याचं ते बघून झालेले असत.  आता मला खूप एकट एकट वाटत.  आई बाबांनी तर ह्या विषयावर माझ्याशी बोलणच सोडलं आहे.  माझी चूक मला खूप उशिरा लक्ष्यात आली.आता मला promotion मिळाल तरी वाटत कि हे सर्व कशासाठी व मला आता खरच एका जीवनसाथीची गरज आहे. आधी मी तुमच्याकडील अनेक चांगली स्थळे छोट्या छोट्या कारणांनी नाकारली.  आता मला ह्याचा खूप पश्चाताप होतो आहे.  आता काही चांगली स्थळे असतील तर प्लीज  मला सांगा,  मी त्यावेळेस फक्त बघते म्हणाले व फोन ठेवला.
तिच्याशी बोलून झाल्यावर मला आठवली ती लहानपणी वाचलेली मिडास राजाची गोष्ट त्यात त्या राजाला सोन्याचा खूप हव्यास असतो व तो देवाला वर मागतो मी ज्याला हात लावेल ते सोन्याचा होऊ दे देव तथास्तु म्हणतो.  राजा आपला राजवाडा त्यातील सर्व वस्तूला सोन्याच करत सुटतो आणि खूप आनंदाने ह्या सगळ्याकडे बघत बसतो.  जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा तो पहिला घासला हात लावतो तर तो सोन्याचा होतो आता सोन कस खाणार ? त्याचवेळेस त्याची लाडकी राजकन्या राजाजवळ येते व राजा तिला हात लावतो तर ती पण सोन्याची होते. त्यावेळेस त्याला सोन्याची खरी किंमत काय आहे ते कळते.  व आपल्या हव्यासाचा दुष्परिणाम लक्ष्यात येतो.  त्यावेळेस मला वाटलं होत एवढा मोढा राजा अस कसा वर मागतो.  परंतु आज आपण सगळे मिडास राजाच झालो आहोत. अजून हव अजून हव मोठ्ठ घर हव, दर महिन्याला बाजारत येणारे नव नवीन मोबाईल, कार्स हव्या सर्व brands च्या वस्तू हव्या . पण ह्यात किती म्हणजे बास हेच आपल्याला कळत नाही. सतत काहीतरी मिळवण्यासाठी आपण उर फुटेपर्यंत धावत आहोत. आयुष्यात ध्येय नक्की असावे ते मिळवण्यासाठी जिद्दीने मेहनत पण करावी परंतु हे करत असताना आपला मिडास राजा तर होत नाहीना हे हि बघावे अथवा सुनिता व मिडास राजा सारखी नंतर पस्तावण्याची वेळ आपल्यावर यायला नको. मिडास राजाला देवाने वर दिला होता व नंतर देवानेच त्याला उपशाप दिला होता. परंतु आपण हा वर देवाकडून न घेता स्वतःच घेतला आहे त्यामुळे वेळीच जाग येण्याचा उपशाप हा आपला आपल्यालाच मिळवावा लागणार आहे.

Sunday 24 June 2012

प्रेमाची भाषा


www.daptaryswiwah.comसमीर आणि सुषमा यांनी आई- वडिलांच्या मदतीने स्वतःचे लग्न ठरवले होते. वेब साईटवर एकमेकांची माहिती बघून ,संपर्क साधून त्यांनी एकमेकांना जाणून घेण्यास सुरुवात केली.काही दिवस,महिने  कामाच्या वेगवेगळ्या जागा आणि वेळा यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होणं कठीण गेलं. पण यावर्षी आपण जोडीदार शोधायला हवा असे दोघांनाही मनापासून वाटत होते. शिवाय त्या दोघांना काम आणि आपलं खाजगी आयुष्य यांची जागा ज्या त्या ठिकाणी कशी असावी हे ही माहित होतं.म्हणून त्यांनी फोन,इमेल या संपर्क माध्यमाशिवाय प्रत्यक्ष भेट घ्यायचे ठरवले. कारण प्रत्यक्ष भेटीत व्यक्ती फोटोपेक्षा वेगळी असू शकत. त्या व्यक्तीचा आवाज,बोलण्याची शैली ,चेहऱ्यावरचे हावभाव,त्याची वागण्याची पद्धत प्रत्यक्ष दिसते आणि त्या सगळ्या मुले व्यक्ती अधिकच सुंदर दिसते असे समीरला आणि मितालीला वाट्त  होते. कारण फोटोमध्ये मिताली थोडी जाड दिसायची यामुळेही काही जणांनी तिचे प्रोफाईल बघण्याचे टाळले होते. मिताली म्हणते,हे बरं झालं .कारण मला वरवर बघून हो म्हणणाऱ्या व्यक्तीला जोडीदार म्हणून निवडायचेच नव्हते.
   ५-६ वेळा प्रत्यक्ष भेटल्या नंतर मिताली आणि समीर यांना वाटले की,आपण एकमेकांबरोबर छान राहू शकू. घरी सांगून लग्न करण्यास हरकत नाही. म्हणून त्यांनी घरी सांगितले. तर तोपर्यंत लग्नाचे मुहूर्तं संपले होते. शिवाय या दोघांनाही पुढचे सहा महिने सुट्टी मिळणार नव्हती . काय करावे? त्या दोघांनी सहा महिन्यानंतर लग्न करूयात असे ठरवले. आणि मधल्या काळात एकमेकांना भेटू या ,हिंडू या असे ठरवले. एकमेकांना भेटी देत,सरप्राइजेस देत त्यांनी लग्नाचा आधीचा  काळ enjoy  केला. नंतर त्यांचे लग्न झाले. वर्षभर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या.एकमेकांचे आवडतं  संगीत ऐकले.वेगवेगळे पदार्थ खाऊन पहिले. त्यांचे दुसरे वर्ष ही कंपनीचे प्रोजेक्ट ,नवीन पद ,जबाबदाऱ्या यांच्यासहित चांगले गेले.
     दोन वर्षानंतर दोघानाही एकदम प्रश्न पडला.लग्नानंतर आपल्यातील प्रेमाचे काय झाले? काहीजण हा प्रश्न मित्रांना विचारतात,काहीजण समुपदेशकाला ,तर काहीजण धार्मिक उपदेशकाला ,ज्योतिषाला विचारतात. तर काहीजण स्वतःलाच विचारतात. काहीवेळेस या संदर्भातील उत्तरे मानसशास्त्रीय भाषेत दिल्याने ती अधिकच दुर्बोध वाटतात. काहीवेळेस या प्रश्नाकडे विनोदी पद्धतीने पहिले जाते. अर्थात बऱ्याच वेळा विनोदात काही सत्य दडलेले असते. पण ते म्हणजे एखाद्या कॅन्सर रुग्णाला अस्पिरीन देण्या सारखे आहे.
     लग्नातून काल्पनिक प्रेमाची अपेक्षा केली जाते आणि बऱ्याच वेळा या अपेक्षेचे मूळ आपल्या मनोरचनेत आहे. प्रत्येक मासिकात वैवाहिक संबंध प्रेमाचे कसे ठेवायचे यावर एकतरी लेख निश्चितच असतो.या विषयावरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. दूरदर्शन ,आकाशवाणीवरही या संदर्भात कार्यक्रम असतात. वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवणे ही गंभीर बाब आहे.
     समीर आणि सुषमा ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये काम करतात. त्या कंपनीत संवाद कौशल्याच्या अनेक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. काहीवेळेस त्यात जोडीदारालाही  सहभागी करून घ्यायचे  असते . त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.
     मित्रानो जसे मराठी,हिंदी,गुजराथी,कन्नड ,जपानी,चीनी ,फ्रेंच आदी भाषा आहेत. हे आपल्याला माहित आहे. आपण सर्वजण आपल्या पालकांची ,नातेवाईकांची भाषा शिकत मोठे होतो. जी आपली प्राथमिक किंवा मूळ भाषा असते. नंतर आपण अजून भाषा शिकतो पण त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. ती आपली दुसरी भाषा असते. या दुसऱ्या भाषेचा उपयोग आपण जितका अधिक करू तितके आपण सहज होवू.भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जर आपण परिणामकारक संवाद साधला तर आपण सांस्कृतिक रेषासुध्दा ओलांडू. आपण फक्त ज्यांच्याशी  संवाद साधायचा आहे. त्यांची भाषा शिकणे आवश्यक आहे.
     हीच गोष्ट प्रेमाच्या राज्यात लक्षात ठेवायची. तुमची भावनिक भाषा यात इंग्लिश आणि चीनी भाषेत जितका फरक असेल तितकाच फरक असेल. जसे समीर प्रामाणिकपणे सुषमाला सांगत होत की, माझे तुझ्यावर प्रेम आहे.तुझ्या कामाचा मला अभिमान वाटतो.वगेरे .पण सुषमाला हे प्रेम त्याच्या वागणुकीत दिसत नसेल तर. म्हणजे फक्त प्रामाणिक असणे पुरेसे नाही. आपण आपल्या जोडीदाराची प्राथमिक प्रेमभाषा शिकून घेतलीच पाहिजे. जर तुम्हाला प्रेमाचे प्रभावी संवादक व्हायचे असेल तर? तुम्हांला काय वाटते? या संदर्भात बरेच काही सांगण्या सारखे आहे.ते मात्र पुढच्या लेखात.

Monday 4 June 2012

योग्य वय

      www.daptaryswiwah.comनीताच लग्न ठरलं आणि आम्ही सगळेच एकदम खुष झालो. एवढ्यात !इतक्या लगेच!  पटकन ! असे विविध उदगार काढून सगळयांनी तिचे आनंदाने अभिनंदन केले. खरतर तिच्या पालकांच्या मनात इतक्या पटकन लग्न जमेल असं वाटत नव्हते. पण नीताने योग्य वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आयुष्यात 'लग्न' हा केंद्रीय भाग नव्हता .पण ते जर करायचे आहे तर योग्य वयात करू.असे तिला वाटले. म्हणून तिने लग्न करण्यासाठी आई -वडिलांना होकार दिला. ती म्हणते ,'मला योग्य जोडीदार हवाच होता. मला माझे पुढचे सगळे दिवस छान त्याच्या बरोबर आनंदात काढायचे होते. हे माझं स्वप्नं म्हणा हवं तर पण वास्तवाला धरून पाहिलेलं स्वप्न होतं. म्हणूनच ते पूर्ण झाल्याचा तिला आणि तिच्या पालकांना आनंद वाटत होता.
 
नीताच म्हणणं आपल्यालाही पटेल. लग्न करायचं आहे की नाही . ते का करायचं ? त्याचे व्यवस्थित मुद्दे तिने लिहून काढले. त्यातून अनेक मुद्दे पुढे आले. प्रथम तिला सर्वात महत्वाचा मुद्दावाटत होता तो म्हणजे समवयस्क जोडीदाराची सोबत. नंतर तिने लग्नाकडून स्वतःच्या अपेक्षा जशा लिहल्या तसेच ती स्वतः कशी आहे,तिचे प्लस point आणि ती कोणत्या गोष्टीत कमी पडते हे ही तिने शोधले . त्यामुळे जोडीदार शोधतांना स्वतःतल्या कमी तिला माहित होत्या.एखादे प्रोफाईल ऑन लाईन बघतांना तिने त्यात काय पहायचे,त्या व्यक्तीच्या अपेक्षा शिक्षण कसे आहे? हे ही तिने स्वतःच्या अपेक्षा आणि शिक्षणाशी पडताळून पहिल्या. कारण बऱ्याच वेळा काय होते मुलगा असतो डिप्लामा  इंजिनियर आणि तो बी.इ. ,एम.इ. मुलींचे प्रोफाईल बघतो आणि त्यांच्याशी संपर्क साधू बघतो.मुलीना त्यांच्या पेक्षा अधिक शिक्षण झालेला मुलगा हवा असतो. मग त्या मुलाला नकार मिळतो आणि तो पुढे मुली बघयला कंटाळतो. लग्न जमत नाही म्हणून तो निराशही होतो. म्हणून आपल्या अपेक्षा ,शिक्षण हे बघूनच प्रोफाईल बघायला हवे. एखादी मुलगी किंवा मुलगा असा असतो की जो शिक्षण ,पैसा यापेक्षा तुमचे विचार,मतं,कुटुंब यांचा विचार करून लग्न ठरवितात. पण त्यासाठी तुम्हांला एकमेकांना भेटायला लागते. भेटण्यासाठी आधी प्रोफाईल पाहावे लागते.
     
मुला-मुलींनी नाव नोंदवतांना आपल्या माहितीत आपले विचार स्पष्टपणे सांगायला हवे. अर्थात सांगतांना समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही. याचाही विचार दोन्ही बाजूंनी करायला हवा. एक गंमत   सांगते सुनीलची आई फोनवर बोलत होती. समजा ती सुनीताच्या आईशी बोलते आहे. असे समजू .तर ती म्हणाली ,आमच्या सुनीलला सिनेमा पाह्यला फार आवडतो पण तो कधी ब्लकने तिकीट घेत नाही. तर याचा सुनीताच्या आईला फार राग आला,ती म्हणाली ,सुनिता रोज ब्लकनेच तिकीट खरेदी करून सिनेमा पाहते. नंतर काय झालं असेल--बरोबर आहे  तुमचा अंदाज .दोन्ही फोन खाडकन बंद झाले. वरवर विचार केला तर यात कदाचित वावगं वाटणार नाही.पण सुनीलच्या आईचा बोलताना टोन वेगळा असेल तर सुनीताच्या आईचा राग रास्त म्हणता येईल. म्हणून सुनीलच्या आईने सुनीलला सिनेमा पाह्यला आवडतो. एवढेच म्हटले असते तरी चालले असते नाही का?
       मित्र -मैत्रिणिनो लग्न करायचे हे नक्की असेल तर योग्य वयात निर्णय घ्या. म्हणजे पुढच्या सर्व गोष्टी सोप्या होतात. नाहीतर मुलगा-मुलगी अशीच पाहिजे,शिक्षण,रूप ,नोकरी ,शहर ,कुटुंब या संदर्भातल्या तुमच्या अपेक्षा तुमच्या स्वतःकडे न बघता खूप उच्च असतील तर नकारांना तोंड द्यावे लागेल.मग आपले वय वाढत जाते आणि आपण त्या सर्व प्रक्रियेलाच कंटाळतो. कंटाळलेली व्यक्ती मग कोणत्याही थातूर -मातुर गोष्टींवर विश्वास ठेवायला लागते आणि शेवटी दुःखी होते.त्यामुळे सुरुवाती पासूनच स्वतः आपण कसे आहोत याचा नीट विचार केला तर दुसऱ्या व्यक्तीकडे चिकित्सकतेने न बघता समजुतीच्या भावनेने बघितले तर पुढील जोडीदार सहितचे आयुष्य सहज सुंदर होण्यास मदत होते.
   
योग्य वेळी लग्नाचा निर्णय माणूस म्हणून व्यक्ती म्हणून सहज जगता येइल अशा अनुरूप अपेक्षा आणि तडजोडीची तयारी असेल तर नीता सारखं आम्ही तुमचं अभिनंदन करण्यास तयार आहोत

Monday 21 May 2012

शिक्षण व परिपक्वता



www.daptaryswiwah.com आमच्या कडे लग्न करू इच्छिणारे तरूण मुलां-मुलींचे फोन येत असतात.काहीवेळेस ते प्रत्यक्ष भेटायला येत असतात.ते भेटायला येतात तेव्हा त्यांच्याशी मोकळेपणी बोलणं होतं.ते ही त्यांच्या अडीअडचणी सांगतात आणि उपायांसाठी चर्चा करतात.एखादा निर्णय घेतांना या चर्चा खूप उपयोगी पडतात असं आमच्या लक्षात आलं आहे. कालही एक छान व्यक्ती आली.ती उच्च शिक्षित होती.आणि तसाच उच्च शिक्षित जोडीदार तिला हवा होता.आम्हांला यात काहीच वावगं वाटलं नाही.आपल्या बरोबरीने शिकलेला जोडीदार असणं ही अपेक्षा फारशी चुकीची नाही.आणि त्यात काही तर्कशुद्ध कारण असेल तर काहीच हरकत नाही.पण जेव्हा ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे पालक जेव्हा एका विशिष्ट शाखेचाच आग्रह धरू लागले तेव्हा मात्र आम्हांला आश्चर्य वाटलं.जेव्हा तिने त्या शाखेचा संदर्भ परिपक्वतेशी लावला तेव्हा मात्र आमच्या आश्चर्यला पारावर राहिला नाही.म्हणजे एखाद्या विशिष्ट शाखेत तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही परिपक्व आणि दुसऱ्या शाखेतील उच्च शिक्षण घेतलेली व्यक्ती अपरिपक्व असं कसं काय? समज वाढावी म्हणून दोन्ही शाखांमध्ये असं कोणतच शिक्षण दिलं जात नाही.हे त्या व्यक्तीला माहित नसेल का?आपण कोणत्या शाखेचा अभ्यास करायचा हे आपल्या आवडीनुसार,पालकांच्या इच्छेनुसार,बाहेर कशाला अधिक पैसा मिळणार आहे हे बघून ठरवतो.कोणता अभ्यासक्रम केला म्हणजे आपण समजदार होवू,परिपक्व होवू याचा विचार कोणी करत नाही.
    कामाचे तास,त्यासाठी करावी लागणारी तडजोड विशेषतः मुलींना ,मिळणारा पैसा,प्रतिष्ठा यांचा विचार करून खूप जण विशिष्ट व्यवसायातील ,शाखेतील व्यक्ती जोडीदार म्हणून निवडतात.ते सांगतांना काही सांगोत.पण मूळ हे पैशात असते.मग



असे एका शाखेची मुलं-मुली ती बहुतेक वेळा सोफ्टवेअर मधील असतात.ती त्यांच्या कामाच्या शेड्यूल मध्ये एकमेकांना वेळ देवू शकत नाही. काही ठिकाणी तर एका वेळी एकच जण घरी थांबू शकतो अशी त्यांची कामाची वेळ असते.ते एकमेकांशी बोलू शकत नाही,काही ठरवू शकत नाही. तरीही त्यांना सहजीवनचा जोडीदार असाच हवा असतो.काही ठिकाणी तर कला शाखेत छान उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीनाही  जोडीदार मात्र सोफ्टवेअर मधील अपेक्षित असतो.असं का होतं? समान आवडी-निवडी असणारा जोडीदाराची अपेक्षा त्या का करत नाही.समजा यांना काही साहित्यिक कार्यक्रम ऐकण्याची,नाटक पाहण्याची आवड असेल आणि  त्यांच्या जोडीदाराला ती आवड नसेल तर ही मुलगी किंवा मुलगा काय करणार? आपल्या आवडी-निवडी सोडून देणार? एक विशिष्ट प्रतिष्टा जपण्यासाठी पोकळ आयुष्य जगणार.कोणत्याही अभिजाततेचा कधीच शोध घेणार नाही.उच्च शिक्षण घेवून आपापल्या क्षेत्रात चमकणारी माणसं अनेकदा बुरसटलेल्या विचारांची,अंधश्रध्द,डोळ्याला झापडं लावून साचेबंद जीवन जगतांना दिसतात. म्हणजे लग्न ठरवतांना आपण नक्की काय पाहत आहोत?फक्त पैसा? जबाबदारी आणि कर्तव्य यांशिवाय येणारा  पैसा?

  आज बहुतांशी मुला-मुलीना मुंबई-पुणे आणि सोफ्टवेअर कंपनी यांचीच साथ हवी आहे.ते दुसरीकडे बघायलाच तयार नाही.या सगळ्याचा अर्थ  कोणाही सामान्य व्यक्तीला कळणार नाही असं थोडच आहे.कारण लग्नाच्या बाजारात मात्र ते ‘शिक्षण बघितलं जातं ते केवळ पदव्यांच्या मोजमापातच!इंजिनियर,डॉक्टर,सी.ए.असेल तर सर्वांनाच ते स्थळ आवडतं,हवं असतं.अमेरिकेतील मुलगा तर त्याच्या साठी भरपूर विचारणा होते.जर या कोणत्याही स्थळाशी नाही जमलं आणि वय ही वाढत गेलं तर मग एक-एक पायऱ्या खाली उतरतात.त्यावेळी ते कमीत कमी पदवीधर,नाहीतर किमान डिप्लोमा झालेला मुलगा असावा असं मुलींना व त्यांच्या पालकांना वाटतं. या ठिकाणी सुसंस्कृत कुटुंब,परिपक्वता,विचारसरणी यांचा विचार फार नंतर येतो.प्रथम विचार येतो तो पैशाचा? नंतर शहराचा,नंतर आमची मुलगी तिथे काही करू शकेल किंवा येणारी मुलगी त्या शहरातली असली आणि नोकरीत असली तर अधिक उत्तम.कारण काळ बदलला आहे ,दोघांनी काम केलं तरच योग्य अशा राहणीमानात राहू शकू.जोडीदाराच्या शिक्षणाचा विचार करतांना त्याबरोबर जे भावी जीवन वाट्याला येणार आहे त्याचाही विचार तितकाच महत्वाचा आहे.कारण उच्च शिक्षणाच पद,पैसा,प्रतिष्ठा याबरोबर सम प्रमाणात असलं तरी वेळेशी मात्र असं व्यस्त असतं. शिवाय अशी व्यक्ती ‘माणूस’ म्हणून कशी आहे, हे वेगळंच! जोडीदार निवडतांना याचं भान हवं.
  लग्नाचा विचार हा एक सोबती,सहजीवनासाठीचा एक जोडीदार,साथी,काही समान आवडी असणारी आयुष्यभराची सोबत यासाठी किती प्रमाणात होतो हे मात्र जोडीदार निवडण्याच्या आजच्या criteria  वरून काहीसे गुपितच राहते.मग आयुष्यभर एक जिगसॉ पझल खेळले जाते.शिक्षणाने स्वतःला एक वेगळे व्यक्तिमत्व मिळते.स्वतःला ओळखण्यासाठी काही कौशल्ये विकसित होतात.तरीही आपण त्याचा उपयोग स्वतःला ओळखण्यासाठी न करता केवळ त्यातून आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याचा विचार करतो.

Wednesday 9 May 2012

सप्तपदी




    
www.daptaryswiwah.com   डॉक्टरांची नृत्यकला स्पर्धा झाली होती आणि त्यात मयंक आणि मधुरेला प्रथम बक्षीस मिळालं होतं.उत्कृष्ट जोडी म्हणून सगळेजण त्यांचं कौतुक करत होते. ते दोघेही खुशीत होते. खुशीतच मयंकने मधुरा पुढे हात केला आणि स्टेजकडे चलण्याची खूण केली.पण मधुराला वाटलं,एवढ हातात हात घालून जायचं कशाला? म्हणून तिने नंतरची खुण केली. तर मयंक म्हणाला,अग लाजतेस कशाला? सप्तपदी सुद्धा आपण अशीच पुरी केली आहे. सगळ्या हिंदू लग्नात सप्तपदीची परंपरा पाळली जाते. काहीजण त्याचा अर्थही जाणूनही घेतात.पण नवीन काळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत.पण आपल्याला लग्न करून ते छान टिकवायचे आहे तर ती सप्तपदी थोडी वेगळी असावी असं नाही वाटत.?वाटतं ना?
    त्या सप्तपदीचा विचार करतांना मला लग्नाकडे वळणारे पहिलं पाऊल हे स्वतःला ओळखणे हे वाटते. आपण कसे आहोत हे एकदा आपल्याला कळले की,प्रेमाची परिभाषा ठरवता येते. कारण बऱ्याच मुला-मुलींना स्वतःला नक्की काय आवडते? स्वतःचा स्वभाव कसा आहे? हेच स्पष्ट नसते. ते कपडेलत्ते,खाणंपिणं,या मुद्दांपर्यंतच विचार करतात. या आवडण्याच्या पलिकडे विचार करायला हवा.तर आपल्या जोडीदाराला त्याच्या पद्धतीने वाढायला वाव देता येईल आणि मगच ते प्रेम होईल.
  स्वतःला ओळखून प्रेम करता आले की,दुसरी पाऊल आहे.बदल स्वीकारण्यास तयार रहा. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय लग्नामुळे होणारा बदल स्वीकारा. आज जग झपाट्याने बदलत आहे. तिथं आपण बदललो नाहीतर मागे पडू असं आपल्याला वाटते न? तसेच आहे.लग्नाकडे पारंपारिक नजरेने न बघता नवीन काळाच्या दृष्टीकोनातून बघायला हवे.म्हणजे जोडीदाराकडे  विशिष्ट चौकटीतून न बघता तो जसा आहे तसा बघा,आणि वेळोवेळी होणारे जोडीदारातील विधायक,नैसर्गिक बदल स्विकारा.
     लग्न करतांना आणि केल्यावर अनेक प्रकारच्या भूमिका आपल्याला आपोआप मिळतात.त्या त्या भूमिकांना आपण न्यायही देत असतो. पण पती-पत्नीच्या भूमिकेत अनेक सत्र असतात. त्यांची देवाणघेवाण करता यायला हवी.आजकाल सर्वजणांना शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी हवी असते. कारण दोघांच्या पगारात घर चालविणे सोपे जाते.म्हणजे स्त्री कमावण्याची जबाबदारी घेते आहे. तिच्या भूमिकेशी समांतर पुरुषांनाही आपल्या भूमिकेत बदला करायला हवेत.घर संभाळण,मुलांचं संगोपन,घरातील वृद्धांची सेवा यातली कौशल्य आत्मसात करायला हवीत. घर दोघांचं आहे.म्हणून भूमिकेत अदलाबदल गरजेची आहे.
   घरामध्ये जोडीदाराबरोबर राहतांना मुखवटे टाळा,ते घालू नका. इतरांशी वागतांना एक चेहरा आणि घरात वागतांना दुसरा चेहरा असं आपण करत असू तर जोडीदाराला गृहीत धरणं होईल.असं करु नका. जोडीदाराचा स्वाभिमान दुखवू नका.

         जोडीदाराचा सन्मान हे पाचवे पाऊल आहे. फक्त आधारासाठी,स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी नातं नसतं.जोडीदारा विषयी आदर,प्रेम मनापासून असायला हवं.जोडीदार सुंदर,पैसेवाला या कारणासाठी तो सन्मान नको तर त्याच्यातील छोट्या गुणांवर प्रेम करा. समोरची व्यक्ती ही स्वतंत्र आहे.हे लक्षात ठेवायला हवं नाही का?
      लग्न पूर्ण जबाबदारीने केले की त्याची अडचण वाटत नाही. म्हणून लग्न झाल्यावर सुद्धा विकसित व्हा.हे पुढचे सहावे पाऊल आहे. दोघांच्या  वेगवेगळ्या गुणांना वाव मिळेल. अशा संधी स्वीकारणं आणि विकसित होणं सहजीवनातला आनंद वाढवतो.
  केवळ लग्नातून नाही तर संपूर्ण जीवनभर शिकतच असतो. परंतु लग्नासह शिकत राहता आलं पाहिजे.इथे स्वयंशिक्षण  ला ,आत्मपरीक्षणाला पर्याय नाही.लग्न ही जगण्याची ,कौशल्य शिकवणारी शाळा आहे.कारण दोन वेगळ्या अनोळखी व्यक्ती एकमेकांशी अत्यंत अनोख्या नात्याने लग्नामुळे जोडल्या जातात.आपल्यात भावनिक मानसिक पातळीवर अनेक बदल होतात.त्यांना सामोरं जाणं आणि त्यातून स्वतःला घडवण हे आवश्यक असतं.
  मित्रांनो या पाऊलांवरून चालले की लग्न ही एक सुंदर गोष्ट होवून जाते.