Monday, 5 March 2012

दिरंगाई

www.daptaryswiwah.com “एक महिन्यापूर्वी त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही त्यांना सगळी माहिती पाठविली होती पण अजून त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.”असं मुलामुलीचे पालक आम्हांला सांगत असतात.आम्ही जेव्हा अशा प्रकारची उत्तरे करणाऱ्या पालकांना विचारतो की, काय अडचण आहे,तुम्ही महिना झाला काहिच निर्णय कळवला नाही तर समोरचे लोक ताटकळत बसतील. तर ते आम्हांला म्हणतात,आमचा मुलगा/मुलगी विचार करते आहे.विश्लेषण करते आहे.आम्ही सगळ्यांना विश्लेषण करायला सांगतो तेव्हा आमचा हेतू स्पष्ट असतो, त्यांना निर्णय घ्यायला सोपं जावं आणि त्यांना योग्य जोडीदार मिळवण्यासाठी मदत व्हावी.
     मी विचार करतो आहे,विश्लेषण करतो आहे असे शब्द वापरून काहीजण निर्णय घ्यायचं टाळतात. या शब्दाखाली स्वतःची दिरंगाई लपवण्याचा प्रयत्न करत असतात. २-३ महिने निघून जातात तरी त्यांचा विचार चालूच असतो, विश्लेषणही चालूच असते.
  आपण सगळ्यांनी लहानपणी ही गोष्ट नक्कीच ऐकली असेल.एक लहान मुलगा असतो तो म्हणतो,मी मोठा झाल्यावर हे करीन,ते करीन आणि सुख प्राप्त करीन.तो मोठा होतो,महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर तो परत म्हणतो मी सुखासाठी हे करीन,ते करीन.मग त्याला वाटते की नोकरी मिळाली की मला सुख प्राप्त होईल,मग त्याला नोकरी मिळते,मग लग्न करावे असं त्याला वाटते. पण जोडीदार निवडण्याच्या काळात तो फक्त स्वप्नरंजनच करतो,फक्त अपेक्षा ठेवतो,आपण कोणाच्या काय अपेक्षा पूर्ण करू शकतो याचा विचार करतच नाही.वास्तवादी विचार करून,काही तडजोडी आपल्याला कराव्या लागतील याचा विचार न करता जोडीदाराचा शोध घेतो.मग वय वाढते आणि एक दिवस त्याच्या लक्षात येते की हा हा म्हणता सारे आयुष्य त्याचे जोडीदारावाचूनच निसटत आहे.आणि आता त्याला साथ देणारे पालक,मित्र-मैत्रिणी कोणी नाही.त्याची त्यावेळची दिरंगाई फक्त त्याच्या सोबत आहे.
    दिरंगाई करणाऱ्यांचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात,मी माझ्या मनाची तयारी करतो आहे” सहा महिने त्यांची तयारी चालूच असते.सबबी सांगण्याची त्यांची सवय त्यांच्या लवकर लक्षात येत नाही.
   आपण जर खरचं मनापासून लग्नाला तयार असू तरच पालकांना तसं सांगा.नाहीतर तुमच्या कडे स्थळं म्हणून लोक येतील आणि तुम्ही त्यांना वरील प्रकारची उत्तरे द्याल.आणि ती ही समोरच्या व्यक्तीवर उपकार केल्यासारखी.तुम्ही नाव नोंदवलं म्हणूनच लोक तुमच्याशी संपर्क करतात.मग त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देणे ही आपली जबाबदारी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण योग्य जोडीदार निवडण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेवून त्याचा पुरेपूर उपयोग करून वर्तमान सार्थ करणं गरजेचे आहे.वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणं होय.
लग्नाचा विचार सकारात्मकतेने करा. त्यासाठी चालढकल करण्याची सवय सोडून द्या.”विचार करूनच पण त्वरित कृती” हा मंत्र लक्षात ठेवा.
नाहीतर खालील उद्गार तुम्हांला काढावे लागतील.
तसं घडू शकलं असतं
मी तसं करायला हवं होतं.
मी ते विचारू शकलो असतो.
मी असा संवाद साधला असता तर बरं झालं असतं
मी थोडा अधिक वास्तववादी विचार केला असता आणि स्वतःला ओळखलं असतं तर किती छान झालं असतं.
असं होवू नये असं वाटत असेल तर जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका.

No comments:

Post a Comment